सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!
सर्पमित्र वनिता बोराडे करणार सर्पदंशमृत्यूचे भय जगातून दूर!
भारतामध्ये दरवर्षी अडीच लाख ते साडे सात लाख लोक (2.5 ते 7.5 %) केवळ सर्पदंशामुळे मुत्युमुखी पडतात. सापांविषयीची भिती, अंधश्रद्धा, गैरसमजुती तसेच वैज्ञानिक माहितींचा अभाव व उपचार साधन सामुग्रीची अत्यल्पता प्रतिबंधात्मक व प्रथमोपचारात्मक बाबींचा प्रचार प्रसार लोकाभिमुख न झाल्याने हे सर्पदंश मुत्युचे प्रमाण जागतिक तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. आपल्या देशात जगातील सर्वात जास्त बिनविषारी साप आढळतात. तरी सुद्धा केवळ अज्ञानामुळे व पारंपारिक आणि गावठी उपचारामुळे लोक दवाखान्यात जाऊन वैद्यकिय उपचार घेताना काही प्रमाणातच दिसून येतात. धार्मिक व घरगुती उपचारात अतिविलंब झाल्याने दवाखान्यात दाखल झालेले रुग्ण डॉक्टरांना उपचार करुन वाचविणे शक्य होत नाही. या हतबल परिस्थितीमुळे नुसता साप दिसताक्षणी लोकांना दरदरुन घाम फुटतो आणि प्रचंड भीतीमुळे जिवाचा थरकाप होतो.सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण दात आणि पाण्याच्या थेंबाप्रमाणे असणारे विष हे हत्तीसारख्या प्राण्यांचाही तडकाफडकी जीव घेते, तिथे मानवाची काय गोष्ट! विषारी सर्पदंश म्हणजे साक्षात मुत्यू !! यमाशी दोन हात ! जीवन मरणाची प्राणांतिक झुंज आणि यामध्यमातून दुर्दैवाने विजयी होतो तो सापच ! अख्खी मानव जात या विषारी सर्पदंशाने हादरुन सोडली आहे. या पृष्ठभुमीवर सर्पमित्र वनिता बोराडे यांचे अँटीस्नेक व्हेनमची प्रोव्हॅक्सीन हे संशोधन महत्वपूर्ण ठरते. सर्पसंरक्षण संवर्धन व प्रबोधनासोबतच सर्पसंशोधन करुन वनिता बोराडे ही प्रतिसर्प विषाची पूर्वप्रति लस ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरोदर माता व शिशु यांच्या लसीकरणासाठी संशोधित करीत आहे. या सर्पविष प्रतिबंधात्मक लसीमुळे सर्पदंशबाधीत रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भातच प्राप्त झाल्याने सर्पदंश उपचारासाठी 96 तास (चार दिवसाचा) वेळ मिळणार आहे. त्यामुळे सर्पदंशाने कोणाचाही तडकाफडकी (तात्काळ) मुत्यू होणार नाही.
जगामध्ये सर्वाधिक विषारी साप हे ऑस्ट्रेलिया देशात असून, तेथे सर्पदंश मृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात कमी आहे; मात्र भारतात बिनविषारी साप जगात सर्वात जास्त असूनही आपल्या येथे सर्पदंश मृत्यू जागतिक तुलनेत सर्वाधिक आहेत. कारण सर्पसंशोधन क्षेत्रात सरीसृप शास्त्रज्ञांना संर्पदंश उपचारावर प्रभावीपणे यश मिळविता आले नाही. योग्य औषधाचा अभाव आणि रुग्णांसाठी त्याचे नियोजन बारगळल्याने सर्पदंश मृत्यू हे सातत्याने वाढत आहेत. वनिता बोराडे यांनी दृढ संकल्प करुन ही उणीव भरुन काढण्यासाठी अथक परीश्रम चालविले आहे. ग्रामिण भागात वास्तव्य, जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण आणि साधनसामुग्रीचा तुटवडा, तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रायोगिक पातळीवर सहकार्य होईल, असे कोणतेही पाठबळ नसताना केवळ आपली जिद्द, निरिक्षण, अनुभव व यातून प्राप्त झालेले ज्ञान यांच्या जोरावर वनिता बोराडे यांनी जगातून सर्पदंश मृत्यूची भीती भविष्यात कायमची दूर करण्याचा विडा उचलला आहे. प्राथमिक संशोधन करुन याचे रितसर पेटंट त्यांच्या सोयरे वनचरे संस्थेच्या माध्यमातून स्वत:च्या नावावर नोंदविले आहे. या संशोधनाचे प्राथमिक चाचणी नमुने, भारतीय औषध आणि आयुर्विज्ञान संस्था यांच्याकडे पाठवून जागतिक आरोग्य संघटनेलाही ते परवानगीसाठी प्रस्तावित केले आहे. या कार्यासाठी आवश्यक असलेली जैव-वैज्ञानिक प्रयोगशाळेची मागणी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. याचा रितसर प्रस्ताव उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्रशिक्षणसंचलायाकडे सुपूर्द केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , सुप्रसिद्ध समाजसेवक विजय वरुडकर हेदेखिल उपस्थित होते.
सर्पप्रतीलसीची पूर्व प्रतीलस ही जगासाठी नवी आशादायी, हमखास प्राणदायी व नवसंजीवन देणारी साबित होणार आहे. वनिता बोराडे यांच्या या संशोधनाला आज जागतिक मान्यता मिळाली असल्याने महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मागील सलग चार वर्षापासून त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे, ही बाब भारतासह आशिया खंडासाठीही अभिमानास्पद आहे.
केवळ साप पकडून सोडण्यापेक्षा जे प्रबोधन आणि जनजागरण आपण करतो, त्याला संशोधनाची जोड देत याही क्षेत्रामध्ये वनिता बोराडे यांनी आपल्या सर्पसंशोधन कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस नागपंचमी सणानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
.jpeg)
Comments
Post a Comment