मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ
मानव व वन्यजीव यांचे नाते हे संघर्षाचे नसून सहअस्तित्वाचे आहे. मात्र वाढते नागरीकरण, जंगलतोड, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक अधिवासांचा होत चाललेला ऱ्हास यांमुळे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. या संघर्षात केवळ मानवाचेच नव्हे तर अनेक निरपराध वन्यजीवांचेही प्राण धोक्यात येत आहेत. अशा परिस्थितीत संघर्षानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संघर्ष होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, अचूक माहिती आणि जनजागृती हेच प्रभावी व शाश्वत साधन ठरू शकतात.
या दृष्टीने जगातील प्रथम महिला सर्परक्षक व वन्यजीव संरक्षक, सरीसृपशास्त्रज्ञ, सर्पतज्ज्ञ व सर्पमित्र कु. वनिता जगदेव बोराडे या गेली अनेक दशके सोयरे वनचरे प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात, भारतात तसेच भारताबाहेरही वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण, संवर्धन व संशोधनाचे कार्य अखंडपणे करीत आहेत. मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची जनजागृती करणे, सर्पदंश व वन्यजीव हल्ल्यांवरील प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देणे, तसेच ग्रामीण व शहरी भागात कार्यशाळा व जनजागृती मोहिमा राबविणे हा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मानव व वन्यजीव यांच्यातील समन्वय वाढावा आणि भीतीऐवजी समज निर्माण व्हावी या उद्देशाने कु. वनिता बोराडे यांनी एक अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वन्यजीव व सर्पविज्ञान माहितीची दिनदर्शिका घरोघरी पोहोचविण्याची जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली आहे. सन २०२६ या चालू वर्षात जवळपास एक लाख दिनदर्शिका वितरित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी वीस हजार दिनदर्शिका केवळ १ जानेवारी ते १५ जानेवारी या अवघ्या पंधरा दिवसांतच वितरित करण्यात आल्या आहेत. ही मोहीम वर्षाअखेरीपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे.
ही दिनदर्शिका घरातील भिंतीवर लावली जावी, जेणेकरून साप व वन्यजीवांबाबतची माहिती सतत कुटुंबीयांच्या नजरेसमोर राहील, असा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे. यामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळत असून भीती, अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर होण्यास मदत होत आहे. या दिनदर्शिकेमध्ये साप व वन्यजीवांविषयी शास्त्रीय, सोपी व अचूक माहिती, आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक संपर्क क्रमांक, सर्पदंश किंवा वन्यजीव हल्ला झाल्यास त्वरित करावयाचे सविस्तर प्रथमोपचार, डॉक्टरांचे मदत क्रमांक तसेच वन्यजीव व साप घराच्या आसपास येऊ नयेत यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय मुद्देसूद स्वरूपात दिले आहेत. त्यामुळे मानवासोबतच अनेक वन्यजीवांचे प्राण वाचण्यासही ही माहिती उपयुक्त ठरत आहे.
या जनजागृती मोहिमेमुळे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होऊन जैवविविधतेची साखळी आणि निसर्गचक्राचे संतुलन राखण्यास मदत होत आहे. शालेय स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या या दिनदर्शिका साप, वन्यजीव व निसर्ग यांच्याबाबत सकारात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहेत. मानव आणि वन्यजीव हे निसर्गातील परस्परावलंबी घटक असून दोघांचेही अस्तित्व निरोगी पर्यावरणावर अवलंबून आहे, ही जाणीव समाजमनात रुजविण्याचे कार्य या मोहिमेद्वारे होत आहे.
“पर्यावरण हेच प्राणजीवन” या विचाराला अनुसरून आणि “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेचे स्वप्न साकार करण्यासाठी या दिनदर्शिकेला वैश्विक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तसेच जागतिक स्तरावर विविध भाषांत या दिनदर्शिकेचा अनुवाद करून ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस कु. वनिता जगदेव बोराडे यांनी व्यक्त केला आहे. मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राबविण्यात येणारी ही व्यापक जनजागृती चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सोयरे वनचरे फाउंडेशनला सर्वांनी सहकार्य व मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्पमाहितीची सोयरे वनचरे दिनदर्शिका २०२६ पुढीलप्रमाणे विविध जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आली.
अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम व अकोला या जिल्ह्यांमध्ये तसेच इतर राज्यांत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनाही ही दिनदर्शिका देण्यात आली. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान तसेच इतर राज्यांचा समावेश आहे.
शासनाच्या विविध विभागांमार्फत—कृषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, महसूल विभाग तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून—शेतकरी व पत्रकार बांधवांना सोयरे वनचरे दिनदर्शिका २०२६ ही सप्रेम भेट म्हणून वितरित करण्यात आली.










.jpeg)




.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)



















.jpeg)
Comments
Post a Comment