विश्वविक्रमी सर्पस्नेही वनिता बोराडे
रचली सर्परक्षणाची जिने विश्वविक्रमी कहाणी
ज्यांनी आपल्या शब्दकोशातून भिती हा शब्द हद्दपार केलाय, साहस, धाडस, निडरता आणि भूतदया ही आभूषणे धारण केली आहेत अशा दुर्लभ व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत वनिताताई बोराडे. बालपणी बुलढाणा जिल्ह्यात आदिवासींच्या सानिध्यात एखाद्या वनबालेसारखे निसर्गस्नेही जीवन जगल्याने आणि कुटुंबातील वारकरी संप्रदायाच्या वातावरणामुळे 'भूतदया परमो धर्माचे ' बीज नकळत रुजलेले. त्यातून निर्माण झालेला वनिताताईंच्या कर्तृत्वाचा विशाल वटवृक्ष आज आपणास बघायला मिळतो. या वटवृक्षाने सर्प प्रजातींना जीवनदान देऊन त्यांच्यावर स्नेहछाया धरण्यासच आपले जीवन समर्पित केले आहे. आपल्या कामावरील निष्ठा, प्रेम, आस्था यामुळे त्यांनी इतिहास घडविला. ' साप ' शब्द जरी ऐकला तरी भीती जाणवते. प्रत्यक्ष समोर दिसल्यावर तर भल्या भल्यांची बोबडी वळते; तिथे वनिताताईंचा सहज वावर असतो. पुरुषांचेच क्षेत्र समजल्या जाणाऱ्या ' सर्पमित्र ' या प्रांतात त्यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आणि विश्वात आपल्या कर्तबगारीने देशाचाही नावलौकीक वाढवला.
वयाच्या 10 वर्षी आपल्या आदिवासी संवगड्यांसारखे आपल्यालाही साप पकडता यावे या बालसुलभ भावनेने त्या साप पकडायला शिकल्या.
विवाहानंतर त्या पती डी. भास्कर यांचे समवेत नाशिक येथे रहायला आल्या. तिथे जलतरण तलावाजवळील इमारतीत त्याचें वास्तव्य होते. एक दिवस अचानक तरण तलावात साप दिसल्याने चाललेला आरडाओरडा वनिताच्या कानावर आला. त्यांनीं धावत जाऊन साडीवरच पाण्यात उडी घेऊन सापाला पकडले. तेव्हा यांचे खूप कौतुक झाले . सापवाली बाईला नाशिकमध्ये सर्पमित्र ही ओळख मिळाली आणि अधिकृत सर्पमित्र म्हणून प्रवासास प्रारंभ झाला. आजतागायत त्यानी 60,000 हून अधिक साप पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात परत सोडून जीवनदान देण्याचे महान कार्य केले आहे.
एकदा सर्पदंश होऊनही त्यांनी काम सोडले नाही हे विशेष कौतुकास्पद आहे. कोणी सापाला मारून टाकायला नको याकरीता बरेचदा त्या बोलावणे येताच जेवणाच्या ताटावरून लगेच उठून घटनास्थळी पोहचतात. कधी कधी दिवसातून 6 - 7 वेळा साप पकडण्यासाठी बोलावणे येते तेव्हा कंटाळा न करता आरोग्याची सबब न देता त्वरित रवाना होतात. याचेच फलस्वरूप पुरस्कारांच्या रत्नांनी त्यांची ओटी भरली जात आहे. त्यांचा लहान मुलगाही आईच्या पावलावर पाऊल ठेवून ख्याती प्राप्त करीत आहे.
देशातल्या पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या निस्वार्थ सर्प सेवा आणि जनजागरण कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ केंद्रीय डाक विभागाने टपाल तिकीट जारी केले आहे. ३५ वर्षांत तब्बल ५१,००० पेक्षा जास्त विषारी आणि बिनविषारी साप नागरी परिसरातून पकडून वनविभागामध्ये नोंदणीकृत करून जंगलात सोडल्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे आहे. त्यामुळेच जगातील एकमेव विश्वविक्रमी महिला सर्परक्षक म्हणून एशिया बुक ,लिमका बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे .
जगातील सर्वोच्च शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सलग तिसऱ्यांदा नामांकन तसेच भारतातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले. महाराष्ट्र राज्य शासनाने वनविभागातर्फे मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे . महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते राजभवनात 2022 चा राष्ट्रीय सेवा सन्मानही प्राप्त झाला आहे. या सर्व पुरस्कारांचा मुकुटमणी 2020 चा नारीशक्ती पुरस्कार त्यांना जाहीर झाला पण लॉकडाऊनमुळे मार्च 2022 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे तो देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे त्या वास्तव्यास असून
सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाऊंडेशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. सर्प आणि इतर वन्य जीव, वने यांचे संरक्षण,संवर्धन, आणि संशोधन यावर त्यांच्या संस्थेमार्फत काम चालते. त्या व त्यांचे पती शाळा शाळांमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रमात सर्पविषयक प्रबोधन व जनजागृती करतात. संस्थेद्वारे सर्पमित्र प्रशिक्षण दिल्या जाते.
'पर्यावरण हेच प्राण संजीवन,
या ब्रिदासाठी कार्यरत आजीवन'
हा या दुर्गेचा बाणा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सौ अपर्णा अजय कुळकर्णी नागपूर
ReplyForward |


Comments
Post a Comment