विश्वविक्रमी सर्पस्नेही वनिता बोराडे
ही वनिता रणरागिणी, शक्तिरुपिणी, मातृरुपिणी रचली सर्परक्षणाची जिने विश्वविक्रमी कहाणी ज्यांनी आपल्या शब्दकोशातून भिती हा शब्द हद्दपार केलाय, साहस, धाडस, निडरता आणि भूतदया ही आभूषणे धारण केली आहेत अशा दुर्लभ व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत वनिताताई बोराडे. बालपणी बुलढाणा जिल्ह्यात आदिवासींच्या सानिध्यात एखाद्या वनबालेसारखे निसर्गस्नेही जीवन जगल्याने आणि कुटुंबातील वारकरी संप्रदायाच्या वातावरणामुळे 'भूतदया परमो धर्माचे ' बीज नकळत रुजलेले. त्यातून निर्माण झालेला वनिताताईंच्या कर्तृत्वाचा विशाल वटवृक्ष आज आपणास बघायला मिळतो. या वटवृक्षाने सर्प प्रजातींना जीवनदान देऊन त्यांच्यावर स्नेहछाया धरण्यासच आपले जीवन समर्पित केले आहे. आपल्या कामावरील निष्ठा, प्रेम, आस्था यामुळे त्यांनी इतिहास घडविला. ' साप ' शब्द जरी ऐकला तरी भीती जाणवते. प्रत्यक्ष समोर दिसल्यावर तर भल्या भल्यांची बोबडी वळते; तिथे वनिताताईंचा सहज वावर असतो. पुरुषांचेच क्षेत्र समजल्या जाणाऱ्या ' सर्पमित्र ' या प्रांतात त्यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आणि विश्वात आपल्या कर्तबगारीने देशाचाही नावलौकीक वाढवला....